
शब्बीर शेख
नांदेड : देगलूर पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचून केलेल्या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या १० मोटारसायकली, अंदाजे ४ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
देगलूर पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, काही इसम नायगाव व परिसरातून कमी किमतीत चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी मौजे खानापूर ता. देगलुर येथे येणार आहेत. या माहितीची खातरजमा करून देगलुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हणमंत शिंदे व त्यांच्या पथकाने खानापूर फाटा येथे सापळा रचला.व आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी एका व्यक्तीस बनावट ग्राहक म्हणून तयार करून त्याला आवश्यक सूचना देऊन संशयितांकडे पाठवले.
यावेळी रात्रीच्या सुमारास दोन इसम एका दुचाकीसह त्या बनावट ग्राहकाला भेटले. चोरीच्या मोटारसायकलीच्या खरेदी-विक्रीबाबत चर्चा सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी अचानक छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत तुकाराम ऊर्फ बाळू गंगाधर गिरी (वय २५, रा. टाकळगाव, ता. नायगाव, जि. नांदेड) यास पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतले तर दुसरा आरोपी शिवकुमार हनमंत कुऱ्हाडे (वय २८, रा. बेगळे नगर, नायगाव, ता. नायगाव, जि. नांदेड) हा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीकडून एमआयडीसी परिसरासह इतर ठिकाणी लपवून ठेवलेल्या चोरीच्या मोटारसायकलींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन एकूण १० मोटारसायकली जप्त केल्या. यापैकी एका मोटारसायकल चोरीप्रकरणी देगलूर पोलीस ठाणे गु.र.नं. ४८७/२०२६, कलम ३०३(२) BNS, तर अन्य एका मोटारसायकल चोरीप्रकरणी कंधार पोलीस ठाणे गु.र.नं. ३७३/२०२६, कलम ३०३(२) BNS अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.यावेळी जप्त करण्यात आलेल्या १० मोटारसायकलींची अंदाजे एकूण किंमत ४ लाख १० हजार रुपये आहे. यामध्ये हिरो स्प्लेंडर, यामाहा FZ, TVS Phoenix आणि हिरो होंडा स्प्लेंडर यांसह विविध मोटारसायकलींचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव, तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. देगलूर पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी वैभव पडवळ, पोलीस उपनिरीक्षक हणमंत शिंदे तसेच त्यांच्या पथकातील अशोक घुमे, नामदेव शिरोळे, ओमप्रकाश डिडेवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला. जप्त करण्यात आलेल्या वाहनांशी संबंधित इतर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास देगलूर पोलिसांकडून सुरू असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.