सामाजिक

खड्ड्यांच्या विळख्यात नांदेड–देगलूर महामार्ग; टोलवसुली मात्र सुसाट!

वझरगा परिसरातील जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला, ठेकेदार व यंत्रणेच्या कारभारावर संताप...

नांदेड : देगलूर- नांदेड राज्य महामार्गा वरील वझरगा परिसरात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नसून अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. रस्त्याची अशी दुर्दशा असताना टोलवसुली मात्र जोमात सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रस्ता खड्ड्यात, टोलवसुली मात्र जोरात!
नागरिकांच्या मते, वाहनधारकांकडून नियमितपणे टोल आकारला जात असताना त्यांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता मिळणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, टोल भरूनही खड्ड्यांमधून प्रवास करण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.
स्थानिकांकडून के. टी. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामकाजाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टोलवसुली सुरू ठेवण्याची घाई आहे; मग रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची घाई का नाही? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी कोणाची?
रस्ते बांधकाम व देखभालीसाठी लागू असलेल्या तांत्रिक नियमांनुसार रस्त्याची गुणवत्ता, देखभाल आणि दोष दुरुस्ती याबाबत संबंधित यंत्रणा व कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित असते. विशेषतः करारातील Defect Liability Period लागू असल्यास त्या कालावधीत निर्माण झालेले दोष करारातील अटींनुसार संबंधित कंत्राटदाराकडून दुरुस्त करून घेणे अपेक्षित असते. त्यामुळे रस्त्याची सद्यस्थिती पाहता करारातील देखभाल-दुरुस्तीच्या अटी, Defect Liability Period, Performance Bank Guarantee आणि कंत्राटदाराच्या जबाबदाऱ्या यांची तातडीने तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पीडब्ल्यूडीच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह…
महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असताना संबंधित सार्वजनिक बांधकाम यंत्रणा नेमकी काय पाहत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभाग जागे होणार का, असा संतप्त सवालही स्थानिकांकडून केला जात आहे.
अपघात घडण्याची वाट पाहताय का?
पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती विशेषतः धोकादायक बनली आहे. रस्त्याची तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवणे, आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी दुरुस्ती करणे आणि रस्त्याच्या गुणवत्तेची तांत्रिक तपासणी करणे गरजेचे आहे.
नागरिकांनी लोकप्रतिनिधी, संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्गाशी संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. करारातील अटींचे उल्लंघन आढळल्यास Performance Bank Guarantee जप्त करणे, दंडात्मक कारवाई करणे आणि आवश्यक असल्यास कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. रस्ता नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आहे की केवळ टोलवसुलीसाठी? हा प्रश्न आता प्रशासनाने गंभीरपणे घेण्याची वेळ आली आहे. खड्डे तातडीने बुजवून रस्ता सुरक्षित न केल्यास नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

nanded updates

नांदेड अपडेट्स हे केवळ एक डिजिटल न्यूज पोर्टल नाही, तर नांदेड जिल्ह्याचा विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान माहितीचा स्रोत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!