सामाजिक

चालकाच्या आजारपणाचे कारण पुढे; पण पर्यायी चालक कुठे? साडेनऊला माहिती, तरी बारा वाजेपर्यंत कारवाई नाही! पंढरपूर बसप्रकरणी देगलूर आगाराच्या उदासीनतेचा कळस…

शब्बीर शेख
देगलूर : येथील प्रवाशांना वेळेवर आणि नियोजनबद्ध बससेवा देणे ही देगलूर एसटी आगाराची महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र, पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना तब्बल तीन तास बसची प्रतीक्षा करावी लागल्याने ही जबाबदारी कितपत पार पाडली जाते, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चालकाची प्रकृती अचानक बिघडल्याने बस वेळेवर सुटू शकली नाही, असे आगारप्रमुखा कडुन सांगितले जात असले तरी चालक ड्युटीवर येणार नसल्याची माहिती सकाळी साडेनऊच्या सुमारास मिळाल्यानंतरही पर्यायी चालकाची व्यवस्था करून बस तातडीने रवाना करण्यात आगार प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे.
 पंढरपूरच्या दर्शनाला जाण्यासाठी 22 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि अन्य भाविक सकाळपासून बसच्या प्रतीक्षेत होते. सकाळी ९ वाजता देगलूर हुन पंढरपूर कडे बस सुटणे अपेक्षित होते मात्र, नियोजित वेळ उलटून गेल्यानंतरही बस उपलब्ध झाली नाही. चालकाची प्रकृती अचानक बिघडल्याचे कारण आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले. चालकाची प्रकृती बिघडणे ही निश्चितच अचानक निर्माण झालेली परिस्थिती असू शकते. मात्र, सकाळी साडेनऊच्या सुमारास चालक उपलब्ध होणार नसल्याची माहिती संबंधित विभागाला मिळाल्यानंतर पुढील अडीच-तीन तास यंत्रणेने काय केले? हा या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. साडेनऊला माहिती मिळाली, मग बारा वाजेपर्यंत पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही? हा मुख्य प्रश्न आहे.
एखाद्या नियोजित फेरीचा चालक अचानक उपलब्ध नसल्याचे समोर आल्यानंतर आगार प्रशासनाने तातडीने पर्यायी चालकाची व्यवस्था करून बस सेवा सुरू करणे अपेक्षित असते. मात्र, साडेनऊच्या सुमारास माहिती मिळाल्यानंतरही बारा वाजेपर्यंत बससेवेचे नियोजन न झाल्याने प्रवाशांना ताटकळत राहावे लागले,  जर पर्यायी चालक उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल अडीच-तीन तास लागत असतील, तर देगलूर आगारातील आपत्कालीन नियोजन व्यवस्था नेमकी कुठे आहे? चालक-वाहकांच्या अनुपस्थितीसाठी पर्यायी मनुष्यबळाची व्यवस्था ठेवली जाते का? ड्युटी चार्टची नियमित पाहणी होते का? आणि आगारप्रमुखांकडून परिस्थितीवर तातडीने नियंत्रण का मिळवले गेले नाही? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत.
प्रवाशांचा संयम सुटला; रास्तारोकोनंतरच यंत्रणा हलली?
तीन तास प्रतीक्षा करूनही बससेवा सुरू न झाल्याने अखेर संतप्त भाविकांनी आक्रमक पवित्रा घेत बस स्थानकामध्येच रास्तारोको केला. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह भाविकांना रस्त्यावर उतरावे लागल्यानंतरच प्रशासनाच्या हालचालींना वेग आल्याचे चित्र दिसून आले. प्रवाशांनी रास्तारोको केल्यानंतरच यंत्रणा जागी होत असेल, तर त्याआधी आगार प्रशासन नेमके काय करत होते? असा संतप्त सवाल आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.मुळात एसटी प्रशासनाकडून प्रवाशांना वेळेवर सेवा देण्याची अपेक्षा असताना, नियोजित बस निघण्याच्या वेळेपासून तब्बल तीन तास प्रवाशांना कोणतीही ठोस पर्यायी व्यवस्था न मिळणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
‘प्रवाशांची सेवा’ की ‘रास्तारोकोनंतरच हालचाल’?
सीमावर्ती देगलूरमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करत असताना एसटी आगाराने अधिक सक्षम नियोजन करणे अपेक्षित आहे. मात्र, पंढरपूरसारख्या महत्त्वाच्या धार्मिक मार्गावरील बससाठी भाविकांना तीन तास ताटकळत ठेवावे लागणे आणि अखेर रास्तारोको करण्याची वेळ येणे, हे आगाराच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे. चालकाची अचानक प्रकृती बिघडली म्हणून बस उशिरा होणे समजू शकते; पण माहिती मिळाल्यानंतरही पर्यायी व्यवस्था करण्यास तासन्‌तास लागणे ही बाब  मात्र कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही. आता वरिष्ठ एसटी अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आगार प्रशासनाची जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा प्रकारामुळे भाविक व सामान्य प्रवाशांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, यासाठी ठोस नियोजन करावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

nanded updates

नांदेड अपडेट्स हे केवळ एक डिजिटल न्यूज पोर्टल नाही, तर नांदेड जिल्ह्याचा विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान माहितीचा स्रोत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!