सामाजिक

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीच्या दुरवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालीका प्रशासणाला निवेदन

देगलूर : शहरातील लेंडी नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरातील अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी, खराब रस्ता आणि अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे देगलूर शहराध्यक्ष विकास नरबागे यांनी 10 सप्टेंबर रोजी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने तीव्र दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांना या परिसरातून जाताना तोंडाला रुमाल बांधून जावे लागत असल्याचे चित्र आहे. सततच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असून, पालीका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, हा परिसर देगलूर शहराचा मुख्य प्रवेशद्वार असल्याने या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक व प्रवासी ये-जा करतात. स्मशानभूमी परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधीचा सामना प्रवाशांनाही करावा लागत असल्याने त्यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरात प्रवेश करतानाच अस्वच्छतेचे हे चित्र दिसत असल्याने शहराच्या स्वच्छतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याशिवाय स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खराब झाला असून, अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी पुरेशी विद्युत प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करीत
स्मशानभूमी परिसरातील साचलेला कचरा तातडीने हटवावा, नियमित स्वच्छता करावी, वाढलेले गवत व दुर्गंधी दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच आवश्यक ठिकाणी विद्युत दिवे बसवावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच या परिसराची नियमित स्वच्छता व देखभालीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. सात दिवसांत आवश्यक कार्यवाही न झाल्यास युवक काँग्रेसच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

nanded updates

नांदेड अपडेट्स हे केवळ एक डिजिटल न्यूज पोर्टल नाही, तर नांदेड जिल्ह्याचा विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान माहितीचा स्रोत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!