सामाजिक

देगलूर तालुक्यात ‘हागणदारी मुक्त गाव’ फलक ठरताहेत नावालाच …

गुड मॉर्निंग पथक पूर्ववत सुरू करण्याची होतेय मागणी

शब्बीर शेख
नांदेड: देगलुर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये हागणदारी मुक्तीचे फलक आजही झळकत असले तरी सध्या वास्तव वेगळेच पाहायला मिळत आहे. तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांच्या हाती पुन्हा टमरेल दिसू लागले असुन गावात प्रवेश करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक गावातील शाळा गावाबाहेर असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंतचा पायी प्रवास या दुर्गंधीग्रस्त रस्त्याने करावा लागत असल्याने हागणदारी मुक्त गाव हे फलक फक्त नावालाच उरले आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
केंद्र व राज्य सरकारने स्वच्छते विषयी अनेक योजना राबवित स्वच्छ भारत मिशन या योजनेवर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला आहे.गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायती स्तरावर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घरोघरी शौचालय कार्यक्रमांतर्गत घरोघरी शौचालय बांधण्यास शासनाने लाभार्थ्यांना अनुदान दिले होते.तरी देखील बहुतांश नागरिक हे उघड्यावरती, रस्त्याच्या बाजूस शौच करण्यासाठी जात असल्याने गावात येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.उघड्यावर शौचास जाऊन अनेक आजारांना जन्म घालण्याऐवजी घरोघरी शौचालय बांधण्याची संकल्पना सरकारने आणली त्यासाठी नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी अनुदानाचा लाभ देत शौचालय बांधणे सक्तीचे केले.मात्र बहुतांश नागरिकांनी यातून सोयीस्कररीत्या मिळालेले अनुदान पचवून हागणदारी मुक्त गाव या योजनेला हरताळ फासला आहे.
शौचालय वापरायचा लाभ शासनाकडून घेऊनही लाभ घेणाऱ्या बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या घरातील कांहीं सदस्य शौचालयाचा वापर न करता आजही उघड्यावर शौचास जाताना दिसून येत आहेत .त्यामुळे ग्रामीण भागातील आजची परिस्थिती पाहता हागणदारी मुक्तीचा फज्जा उडाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. त्यामुळे शासनाकडून ज्यांनी शौचालय बांधकामासाठी शासकीय अनुदान घेतले आहे व त्याच परिवारातील सदस्य बाहेर शौचास जात असतील तर अशा लाभ घेतलेल्या कुटुंबाकडून अनुदान वसूल करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.
आजही तालुक्यातील अनेक गावात प्रवेश करताना नाकास रुमाल बांधूनच जावे लागत असल्याचे वास्तव आहे.वास्तविक पाहता तालुक्यातील अनेक गावे खऱ्या अर्थाने हागणदारी मुक्त झालेले नाहीत ग्रामीण भागात आजही सकाळी व सायंकाळी नागरिक रस्त्याच्या कडेने शौचालयास बसत असल्याचे चित्र हमखास पाहायला मिळते. परिणामी त्या गावातील रस्त्याने जाताना नागरिकांना नाक बंद करून जाण्याची वेळ येत आहे. त्यासाठी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना रोखण्यासाठी तालुक्यात गुड मॉर्निंग पथक पूर्ववत सक्रिय होणे गरजेचे बनले आहे.

nanded updates

नांदेड अपडेट्स हे केवळ एक डिजिटल न्यूज पोर्टल नाही, तर नांदेड जिल्ह्याचा विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान माहितीचा स्रोत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!