शब्बीर शेख
देगलूर : शहरातील मदनुर नाका हा अपघातप्रवण चौक म्हणून ओळखला जात असतानाही येथे गोल सर्कल उभारण्याचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. वर्षभरापूर्वी मागणी होऊनही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नांदेड–देगलूर–हैदराबाद या महत्त्वाच्या मार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. देगलूर शहरात प्रवेश करण्यासाठी वाहनांना मदनुर नाक्यावर वळण घ्यावे लागते. मात्र या ठिकाणी गोल सर्कल नसल्यामुळे समोरासमोर धडक होण्याच्या घटना वारंवार घडत असून अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तरीही संबंधित यंत्रणा मात्र केवळ आश्वासनांपुरतीच मर्यादित राहिल्याचा आरोप होत आहे.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी १२ ऑगस्ट २०२४ रोजी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, देगलूर यांच्याकडे निवेदन देऊन मदनुर नाका येथे तातडीने गोल सर्कल उभारण्याची मागणी केली होती. अन्यथा कायदेशीर मार्गाने उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला होता.
या निवेदनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, नायगाव यांनी १३ मार्च २०२५ रोजी लेखी पत्राद्वारे सर्कल उभारणीसाठी अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविल्याचे सांगितले होते. मंजुरी मिळताच प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले होते.
मात्र त्या आश्वासनालाही अनेक महिने उलटून गेले असून मदनुर नाक्यावर सर्कल उभारणीचे काम अद्याप थंड बस्त्यातच आहे. त्यामुळे ” अपघात झाल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार काय?” असा संतप्त सवाल वाहनधारक व नागरिक उपस्थित करत आहेत. अपघात रोखण्यासाठी तातडीने सर्कल उभारण्याची मागणी आता पुन्हा जोर धरत असून, केवळ कागदोपत्री हालचाली न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकांकडून होत आहे.


