
देगलूर : १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात अदम्य शौर्य गाजवून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे परमवीर चक्र विजेते शहीद कं.क्व.मा. अब्दुल हमीद यांच्या शहादत दिनानिमित्त १० सप्टेंबर रोजी देगलूर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शौर्याला, राष्ट्रप्रेमाला आणि मातृभूमीवरील अढळ निष्ठेला भावपूर्ण मानवंदना दिली.
यावेळी शहीद अब्दुल हमीद स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. काजी विलायत अली यांनी, “अब्दुल हमीद यांची देशभक्ती ही प्रत्येक भारतीयासाठी राष्ट्रनिष्ठेचा आदर्श आहे. धर्म, जात, भाषा व प्रांताच्या पलीकडे राष्ट्र हीच सर्वोच्च ओळख मानण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते,” असे सांगितले. तर प्रा. डॉ. भिमराव माळगे म्हणाले, “देशभक्ती केवळ घोषणांमध्ये नसून संकटाच्या वेळी राष्ट्रासाठी त्याग करण्याच्या तयारीत असते. अब्दुल हमीद यांनी आपल्या शौर्याने ही देशभक्ती कृतीतून सिद्ध केली.” तरुण पिढीने शहीदांच्या जीवनातून शिस्त, धैर्य, त्याग आणि कर्तव्यभावना आत्मसात करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
१९६५ च्या भारत – पाकिस्तान युद्धात प्रतिकूल परिस्थितीत शत्रूच्या रणगाड्यांना लक्ष्य करत अब्दुल हमीद यांनी असामान्य शौर्य दाखविले. त्यांच्या या पराक्रमाची दखल घेत त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करताना उपस्थितांनी ‘देश प्रथम’ ही भावना मनात रुजविण्याचा संकल्प केला. शहीद अब्दुल हमीद यांच्या शौर्याची प्रेरणा घेऊन राष्ट्रहित, राष्ट्रएकता आणि देशसेवेला सर्वोच्च स्थान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करून करण्यात आली.
कार्यक्रमास नगराध्यक्ष प्र. बालाजी टेकाळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, ॲड मोहसिनअली काजी, देवेंद्र मोतेवार, नगरसेवक सुमित कांबळे, प्रा. डॉ. भिमराव माळगे, ॲड. काजी विलायत अली, प्रा. भिमराव दीपके, पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस कॉ. भिसे, पाशा बाटको, अमित कांबळे, खालेद पटेल, ॲड. इनामदार, ॲड. अब्दुल रझाक, ॲड. राजकुंटवार, सिराज देसाई, सुजात देसाई, काझी सुफियान, सय्यद नवीद अंजुम, सय्यद अरफात, सय्यद माज काझी आदी मान्यवर उपस्थित होते.


