क्राइम

परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक पडवळांचा कारवाईचा धडाका; 205 किलो प्रतिबंधित गोवंशीय मांस जप्त!

गुटखा, बैलांची सुटका आणि आता मांसविक्रीवर कारवाई; मटका व्यवसायाकडे मोर्चा वळविण्याची नागरिकांची मागणी...

शब्बीर शेख
नांदेड : देगलूर शहरात अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक पडवळ यांनी कारवाईची मोहीम तीव्र केल्याचे चित्र दिसत असून, मंगळवारी दुपारी गुमटबेस परिसरात सार्वजनिक रस्त्यालगत प्रतिबंधित गोवंशीय प्राण्याचे मांस विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत अंदाजे 41 हजार रुपयांचा 205 किलो मांस जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नजीर कुरेशी, अबरार कुरेशी व अजिम कुरेशी रा. देगलुर  हे गुमटबेस परिसरातील सार्वजनिक रस्त्यालगत प्रतिबंधित गोवंशीय प्राण्याचे मांस विक्री करत असल्याचे कारवाई दरम्यान आढळून आले.  संबंधितांनी प्रतिबंधित गोवंशीय प्राण्याची कत्तल करून उघड्यावर मांस विक्री केल्याचा आरोप पोलिसांच्या फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन देगलूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 425/2026 अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर धडक कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी ज्ञानोबा केंद्रे, बळीराम घुळे, मधुकर नामपल्ले, संतोष बोंकलवार आदींनी केली.
पडवळांचा कारवाईचा धडाका; अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ!
परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक पडवळ यांनी देगलूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा सपाटा सुरू केल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी गुटख्याविरोधात कारवाई करण्यात आली होती. तसेच कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आलेल्या दोन बैलांची सुटका करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली होती. आता तब्बल 205 किलो प्रतिबंधित गोवंशीय मांस जप्तीची कारवाई झाल्याने अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचा स्पष्ट संदेश या कारवायांमधून गेला आहे.
आता ‘चोरी चोरी, चुपके चुपके’ सुरू असलेल्या मटक्याचा नंबर कधी?
दरम्यान, देगलूर शहर व परिसरात मटका व्यवसाय चोरीछुप्या पद्धतीने अद्याप सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. उघडपणे कारवाई होत असली तरी काही ठिकाणी छुप्या पद्धतीने हा अवैध व्यवसाय चालत असल्याचे बोलले जात आहे. गुटखा, अवैध कत्तल आणि इतर गैरकायदेशीर धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक पडवळ यांनी चोरी चोरी चुपके चुपके घेण्यात येत असलेल्या मटका चालकांची माहिती घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. देगलूरमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी सुरू असलेली कारवाई आता मटका व्यवसायापर्यंत पोहोचणार का? चोरीछुप्या पद्धतीने सुरू असलेल्या मटक्याच्या धंद्यांवरही पडवळांचा घाव पडणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

nanded updates

नांदेड अपडेट्स हे केवळ एक डिजिटल न्यूज पोर्टल नाही, तर नांदेड जिल्ह्याचा विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान माहितीचा स्रोत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!