देगलूर : शहराच्या भविष्यातील वाहतुकीचा आणि विकासाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता थेट दिल्ली दरबारी धडक देण्यात आली आहे. देगलूर नगर परिषदेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती सौ. रत्नमाला रमेशराव कौरवार यांनी भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीनजी गडकरी यांचे याप्रकरणी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
देगलुर शहरातून जाणाऱ्या NH-63 (रेणापूर-उदगीर-देगलूर) या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये होट्टल फाटा ते छत्रपती शिवाजी उद्यान या शहरांतर्गत भागाचा ‘अर्बन रोड डेव्हलपमेंट’ (Urban Road Development) अंतर्गत सर्व सोयी-सुविधांनिशी कायापालट करावा, अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
शहराचा वाढता विस्तार आणि पुढील ३० ते ४० वर्षांतील वाहतुकीचा संभाव्य ताण लक्षात घेऊन सौ. रत्नमाला कौरवार यांनी पत्रात अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मुख्य रस्त्याचे तब्बल १०० फूट रुंदीकरण करण्यात यावे, रस्त्याच्या मध्यभागी योग्य आकाराचा रोड डिव्हायडर उभारण्यात यावा, तसेच स्थानिक नागरिकांच्या सुविधेसाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी सर्व्हिस रोड आणि पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग असावा, अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत.
केवळ रस्ता न बांधता तो आधुनिक आणि सुरक्षित असावा, यावर भर देत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अत्याधुनिक स्ट्रीट लाईट व्यवस्था करणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘ग्रीन बेल्ट’ विकसित करून वृक्षारोपण करणे, आणि पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून दर्जेदार ड्रेनेज सिस्टीम उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण रस्त्यावर फुटपाथ व झेब्रा क्रॉसिंगची स्पष्ट व्यवस्था असावी, प्रमुख चौक आणि जंक्शनचे आधुनिक वाहतूक नियोजन केले जावे, तसेच शहराच्या मुख्य प्रवेशद्वारांचे भव्य सुशोभीकरण करण्यात यावे, असाही आग्रह या पत्रात धरण्यात आला आहे.
हा मार्ग देगलूर शहराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाची भाग्यरेषा ठरणार असल्याने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण आराखडा तयार करताना देगलूर नगर परिषद आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा प्रत्यक्ष विचार करून या मागण्यांचा मुख्य प्रकल्पात समावेश करावा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी थेट मागणी करण्यात आली आहे. नेहमीच विकासाला प्राधान्य देणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देगलूरकरांच्या या हक्काच्या मागण्यांना तातडीने मंजुरी देतील, अशी तीव्र अपेक्षा सौ. रत्नमाला कौरवार यांनी व्यक्त केली आहे.



