नांदेड : देगलूर पोलीसांकडुन शहरात मटका-जुगार पूर्णपणे बंद असल्याचा दावा केला जात असतानाच रोहिदास चौक परिसरात मटका घेणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केल्याने ‘मटका बंद’च्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे मटका बंद असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे मटका घेताना व्यक्ती सापडायची, हा विरोधाभास आता नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
शहरात मटका चोरी-चुपके सुरू असल्याच्या चर्चांना आता पोलिसांच्या कारवाईमुळेच बळ मिळाले आहे. शहरातील रोहिदास चौक परिसरातील ‘श्रीदेवी’ मटका-जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बुधवार, ५ ऑगस्ट रोजी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत एका संशयिताविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मटका पूर्णपणे बंद असल्याचा दावा प्रत्यक्ष कारवाईशी विसंगत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
एकाला पकडून मटका बंद होणार का?
मटका घेताना एखाद्या व्यक्तीवर कारवाई करणे ही कारवाईची केवळ एक बाजू आहे. मात्र, मटका चालवणारे मुख्य बुकी कोण? हा पैसा कुठे जातो? त्यामागील सूत्रधार कोण? या प्रश्नांची उत्तरे शोधून मूळ नेटवर्कवर कारवाई होणे गरजेचे आहे. केवळ मटका घेणाऱ्या व्यक्ती किंवा छोट्या एजंटवर कारवाई करून हा अवैध व्यवसाय संपणार नाही. उलट अशा कारवायांनंतर काही दिवसांनी त्याच प्रकारचा व्यवसाय पुन्हा सुरू होत असेल, तर पोलिसांच्या कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
आता पोलिसांनी ‘मटका बंद’ कृतीतून सिद्ध करावा!
रोहिदास चौकातील कारवाईनंतर देगलूर पोलिसांनी शहरातील मटका व्यवसायाच्या इतर संभाव्य ठिकाणांचीही सखोल माहिती घेऊन धडक व सातत्यपूर्ण कारवाई करणे गरजेचे आहे. केवळ एखाद्या एजंटवर किरकोळ कारवाई करून त्याची प्रसिद्धी करण्यापेक्षा मटका व्यवसायाचे संपूर्ण नेटवर्क, मुख्य बुकी आणि सूत्रधारांपर्यंत पोहोचून कठोर कायदेशीर कारवाई झाल्याची ठोस उदाहरणे समोर आली, तरच अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये कायद्याची भीती निर्माण होईल.
पोलिसांची कारवाई ही केवळ कागदोपत्री किंवा दाखवण्यापुरती न राहता तिचा प्रत्यक्ष परिणाम शहरात दिसून आला पाहिजे. ‘मटका बंद आहे’ असे सांगण्यापेक्षा शहरात मटका व्यवसायाला थारा नाही, हे आपल्या कारवाईतून पोलिसांनी सिद्ध करणे आवश्यक आहे. त्यामुळे देगलूर पोलिसांनी आता मटका व्यवसायाच्या मुळावर घाव घालून संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी निर्णायक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अन्यथा ‘मटका खरोखरच बंद आहे की केवळ दाखवण्यापुरती कारवाई सुरू आहे?’ हा सवाल आता यापुढे अधिक तीव्र होणार आहे.