सामाजिक

दोन थेंब पाऊस पडला की वीज गायब ! देगलूरच्या महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर…

शब्बीर शेख
नांदेड : देगलूर शहर व तालुक्यात महावितरणच्या गलथान आणि निष्क्रिय कारभाराचा कळस झाला असून, आकाशात ढग जमले किंवा पावसाचे दोन थेंब पडले की वीजपुरवठा खंडित होणे ही जणू महावितरणची ठरलेली कार्यपद्धतीच बनली आहे. ‘दोन थेंब पाऊस आणि वीज गायब’ या प्रकारामुळे देगलूरकर अक्षरशः हैराण झाले आहेत.
पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्रे आणि वीज यंत्रणेची देखभाल करणे ही महावितरणची जबाबदारी असताना, प्रत्यक्षात ही यंत्रणा केवळ कागदावरच कार्यरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. किरकोळ पाऊस आणि वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होत असेल, तर महावितरणकडून करण्यात येणारी देखभाल नेमकी कोणासाठी  आणि कशासाठी, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
वीज गेल्यानंतर ग्राहकांनी तक्रार केली तरी तक्रार नोंदविणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांना फोन करणे आणि वीज कधी येणार याची वाट पाहणे एवढेच देगलूरकरांच्या नशिबी आले आहे. वीजपुरवठा कधी सुरू होईल, बिघाड कुठे झाला आहे, दुरुस्तीचे काम सुरू आहे का, याची कोणतीही ठोस माहिती ग्राहकांना दिली जात नाही. ग्राहकांकडून वीजबिल वसुली मात्र वेळेवर; पण सेवा देताना महावितरणचा कारभार मात्र बेभरवशाचा! अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
वारंवार होणाऱ्या वीजखंडितामुळे विद्यार्थी, व्यापारी, लघुउद्योजक, ऑनलाइन काम करणारे नागरिक तसेच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात महावितरण अपयशी ठरल्याचे चित्र वरील प्रकारावरून दिसून येत आहे. ‘वीज आली तर नशीब, गेली तर महावितरणची नेहमीचीच कहाणी’ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दोन थेंब पाऊस पडला की वीज जाते, तर महावितरणची यंत्रणा नेमकी कशासाठी? नागरिकांच्या या संतप्त प्रश्नाचे उत्तर महावितरणचे अधिकारी देणार का? की दरवेळीप्रमाणे तक्रारींकडे दुर्लक्ष करून ग्राहकांना अंधारातच ठेवणार, असा सवाल आता देगलूरकरांकडून उपस्थित केला जात असुन  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून कागदी अहवाल तयार न करता प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून विद्युत यंत्रणेची पाहणी करावी आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी.अशी मागणी पुढे येत आहे.

nanded updates

नांदेड अपडेट्स हे केवळ एक डिजिटल न्यूज पोर्टल नाही, तर नांदेड जिल्ह्याचा विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान माहितीचा स्रोत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!