
देगलूर : सामान्य जनतेच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि प्रशासकीय दिरंगाईविरोधात निर्भीडपणे आवाज उठविणारे ज्येष्ठ पत्रकार शब्बीर शेख यांची माहिती अधिकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे माहिती अधिकार चळवळीला नवी ऊर्जा मिळणार असून भ्रष्टाचारा विरोधातील लढा अधिक तीव्र होणार असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून शब्बीर शेख यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या चुकीच्या कारभारावर निर्भीडपणे प्रकाश टाकत त्यांनी लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
आता माहिती अधिकार संरक्षण समितीच्या माध्यमातून ते शासन-प्रशासनातील अपारदर्शकता, भ्रष्टाचार, हलगर्जीपणा आणि दिरंगाईविरोधात अधिक प्रभावीपणे लढा उभारणार आहेत. माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करून नागरिकांना न्याय मिळवून देणे, शासनाच्या कामकाजात पारदर्शकता निर्माण करणे आणि जनतेच्या हक्कांसाठी व्यापक जनजागृती करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.
दि. १६ जून रोजी नांदेड येथील समितीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख जाकेर शेख सगीर अर्धापुरकर (महाराष्ट्र भूषण), प्र. प्रदेशाध्यक्ष प्रवीण कानघुले आणि प्रदेश कार्याध्यक्ष सुनील भाऊ कांबळे यांच्या हस्ते शब्बीर शेख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
संस्थेच्या नेतृत्वाने त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव, निर्भीड पत्रकारिता, जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली तळमळ आणि जनसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
शब्बीर शेख यांच्या नियुक्तीनंतर “पत्रकारितेतील निर्भीड आवाज आता माहिती अधिकाराच्या लढ्यात अधिक बुलंद होणार”, अशा प्रतिक्रिया नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून व्यक्त होत आहेत. जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या या लढवय्या व्यक्तिमत्त्वाकडून आगामी काळात भ्रष्टाचाराविरोधात आणि पारदर्शक प्रशासनासाठी प्रभावी व निर्णायक कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.