शैक्षणिक

चव्हाणवाडीतील जीर्ण शाळेचा प्रश्न ऐरणीवर;

दुरुस्ती करा, अन्यथा दुर्घटनेस प्रशासन जबाबदार – ॲड. सुरेखा पवार

शब्बीर शेख

नांदेड :  देगलूर तालुक्यातील मौजे हनेगाव अंतर्गत चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शाळेची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी किंवा नवीन शाळा इमारतीस मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. सुरेखा विशाल पवार यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती देगलूर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शाळेच्या भिंतींना मोठे तडे गेले असून छताचीही अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात छताला मोठ्या प्रमाणात गळती लागत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चव्हाणवाडी परिसरातील अनेक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत किंवा नवीन शाळा इमारतीच्या बांधकामास त्वरित मंजुरी देऊन कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी ॲड. सुरेखा विशाल पवार यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून वेळकाढूपणा केला गेला आणि भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील.”
या निवेदनामुळे चव्हाणवाडी येथील शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालक, ग्रामस्थ आणि नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या हितासाठी तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

nanded updates

नांदेड अपडेट्स हे केवळ एक डिजिटल न्यूज पोर्टल नाही, तर नांदेड जिल्ह्याचा विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान माहितीचा स्रोत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!