
शब्बीर शेख
नांदेड : अवैध वाळू वाहतुकीविरोधात देगलूर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 20 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा एक हायवा टिप्पर जप्त करण्यात आला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यां विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे 6 जुलै 2026 रोजी देगलूर शहराजवळील खानापूर फाटा परिसरात पोलिसांनी सापळा रचून TS-36-T-3865 क्रमांकाचा हायवा टिप्पर अडवुन तपासणी केली असता कोणताही वैध परवाना नसताना लाल वाळूची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.यावेळी पोलिसांनी अंदाजे 7 ब्रास लाल वाळू (किंमत 49 हजार रुपये) व हायवा टिप्पर (किंमत 20 लाख रुपये) असा एकूण 20 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी चालक दीपक हणमंत लोणे (वय 44, रा. मंडगी ता. देगलूर, जि. नांदेड) याच्याविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 326/2026 नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट, पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलेमवाड, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे तसेच देगलूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
दरम्यान, देगलूर परिसरात रात्रीच्या सुमारास अवैध वाळूची वाहतूक करणारे आठ ते दहा टिप्पर नियमितपणे सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे. काही हायवाचालक पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आपला मार्ग बदलत असल्याच्याही चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलेमवाड यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक रात्रीच्या वेळी विविध मार्गांवर धडक तपासणी मोहीम राबविल्यास अवैध वाळू वाहतुकीच्या मोठ्या साखळीवर कारवाई होऊ शकते, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.