हवामान

सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे देगलूरकर हैरान ;

महावितरण नावाचा विभाग अस्तित्वात तरी आहे का? देगलुरकरांचा संतप्त सवाल...

शब्बीर शेख…
नांदेड :  देगलूर शहर व परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. दिवस-रात्र सुरू असलेली अघोषित वीज कपात, कमी दाबाचा वीजपुरवठा आणि तक्रारींकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे  देगलुरात “महावितरण नावाचा विभाग अस्तित्वात तरी आहे काय?” असा संतप्त सवाल नागरिकां मधून विचारला जात आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये किरकोळ कारणांवरून तासन्तास वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, एरव्ही वीजबिलाच्या वसुलीसाठी कठोर भूमिका घेणारे महावितरण थकीत वीजबिल असल्यास ग्राहकांचे वीज कनेक्शन कोणतीही तडजोड न करता तत्काळ खंडित करते. मात्र, ज्या ग्राहकांकडून नियमितपणे वीजबिलाची वसुली केली जाते, त्यांनाच दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा देण्यात महावितरण अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे “बिल वेळेवर भरायचे आम्ही आणि सेवा मात्र निकृष्ट?” असा संतप्त सवाल देगलूरकर उपस्थित करत आहेत
.
या पार्श्वभूमीवर नागरिकांचे म्हणणे आहे की, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तक्रार नोंदवली तरी प्रतिसाद मिळत नाही. मात्र, वीजबिल वसुलीच्या बाबतीत महावितरणची तत्परता कायम दिसून येते. त्यामुळे “सेवा शून्य आणि बिल पूर्ण” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. देगलूरकरांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेण्याचा प्रयत्न न करता अखंड व दर्जेदार वीजपुरवठा सुनिश्चित करावा. अन्यथा लोकशाही मार्गाने  तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा ईशारा दिला आहे.
इतकेच नव्हे तर, पावसाचे केवळ काही थेंब पडले किंवा शुल्लक वारे सुटले तरी देगलूर शहराचा वीजपुरवठा तासन्तास खंडित होतो, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. नैसर्गिक आपत्ती नसतानाही किरकोळ पाऊस वा वाऱ्यामुळे वीज गायब होत असेल, तर देगलुरच्या महावितरणच्या यंत्रणेची क्षमता आणि देखभालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

nanded updates

नांदेड अपडेट्स हे केवळ एक डिजिटल न्यूज पोर्टल नाही, तर नांदेड जिल्ह्याचा विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान माहितीचा स्रोत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!