सामाजिक

एकीकडे ‘महाराजस्व समाधान शिबिर’, दुसरीकडे आधार केंद्राला कुलूप! देगलूरकरांची होतेय मोठी गैरसोय…

शब्बीर शेख

नांदेड : शासनाकडून नागरिकांच्या विविध समस्या तातडीने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ राबविले जात असताना, दुसरीकडे उपजिल्ह्याचे ठिकाण असलेल्या देगलूर शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये सुरू असलेले आधार कार्ड केंद्र बंद करण्यात आल्याने सर्व सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजातील विसंगतीवर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आजच्या काळात आधार कार्ड हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजापासून शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, बँकिंग व्यवहार आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक झाले आहे. शासनाने अनेक योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. मात्र, आधार कार्डची नवीन नोंदणी, दुरुस्ती, मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी देगलूरमध्येच सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शिबिरांत समस्या सोडविण्याचा दावा;
मग आधारची समस्या कोण सोडवणार?
एकीकडे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रशासनाकडून मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र, दुसरीकडे आधार कार्डसारख्या अत्यावश्यक सुविधेचे केंद्रच बंद ठेवले जात असल्याने “शिबिरांमध्ये समस्या सोडविण्याचा दावा केला जातो, पण नागरिकांच्या मूलभूत अडचणींकडे प्रशासनाचे लक्ष कधी जाणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाच्या घोषणांचा फायदा कागदावरच?
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध शिबिरे, अभियान आणि योजनांची घोषणा केली जाते; मात्र प्रत्यक्षात अत्यावश्यक सेवा बंद असतील तर या सर्व उपक्रमांचा उपयोग काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. फोटोसेशन आणि घोषणांपेक्षा नागरिकांना प्रत्यक्ष सुविधा देणे महत्त्वाचे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
आधार केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी…
देगलूर पोस्ट ऑफिसमधील बंद असलेले आधार कार्ड केंद्र तातडीने सुरू करावे, तसेच नागरिकांची वाढती गरज लक्षात घेऊन अतिरिक्त आधार केंद्रांची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे.
एकीकडे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’च्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा दावा आणि दुसरीकडे आधारसारखी अत्यावश्यक सेवा बंद—या विरोधाभासी कारभारामुळे देगलूरकरांमध्ये तीव्र संताप आहे. प्रशासनाने आता घोषणांचा दिखावा न करता आधार केंद्र तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ प्रशासनावर येईल.असा इशारा सुज्ञ नागरिकांकडून दिला जात आहे.

nanded updates

नांदेड अपडेट्स हे केवळ एक डिजिटल न्यूज पोर्टल नाही, तर नांदेड जिल्ह्याचा विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान माहितीचा स्रोत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!