शब्बीर शेख
देगलूर : येथील पोलीस ठाण्यातील डीबी पथकाच्या कारवाईच्या पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, कारवाईपेक्षा आर्थिक तडजोडींना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष जेजेराव शिंदे पाटील यांनी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) यांच्याकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे देगलूर पोलीस ठाण्यातील डीबी पथकाच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
डीआयजींकडे सादर करण्यात आलेल्या तक्रारीत, देगलूर पोलीस ठाण्यातील डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक महाजन म्हैसनवाड यांच्यासह त्यांच्या टीमच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करण्यात आले असुन करडखेड येथील चोरीचा मोबाईल व लॅपटॉप खरेदी प्रकरणात कारवाईच्या नावाखाली आर्थिक तडजोड करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच प्रतिबंधित गुटखा, अवैध दारू विक्री आणि पत्त्यांच्या क्लबवर धाड टाकून कारवाई ऐवजी सेटलमेंट वर भर दिला गेल्याची तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करताना अनेक वेळा आर्थिक तडजोडी करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय बळेगाव येथील एका प्रकरणात आरोपीकडे सहा अंकी रकमेची मागणी केल्याची ध्वनिमुद्रिका (रेकॉर्डिंग) झाल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला असून, त्या प्रकरणावर पडदा टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे यातील काही प्रकरणात केवळ आकडेवारी आणि रेकॉर्डवर कारवाई दाखविण्यासाठी थातुर मातुर गुन्हे दाखल करण्याची किमया डीबी पथकाकडून केली जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी कारवाईचा केवळ देखावा केला जात आहे. या सर्व प्रकारांमुळे “कारवाईचे नाटक आणि सेटलमेंटचा व्यवहार” हेच जणू संबंधित अधिकाऱ्यांचे अलिखित धोरण बनल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचा उल्लेख करीत या सर्व प्रकारामुळे पोलीस प्रशासनावरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र विभागीय चौकशी (डी.ई.) करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी व त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी जेजेराव शिंदे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, या तक्रारीतील आरोपांबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी या आरोपांची निष्पक्ष चौकशी करणार का, याकडे देगलूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.