क्राइम

एक चोरी उघडकीस आली नाही, तोच दुसरी चोरी! देगलूर पोलिसांना चोरट्यांचे खुले आव्हान;

24 तास उलटूनही आरोपी मोकाट!

शब्बीर शेख
नांदेड : देगलूर शहरातील अत्यंत वर्दळीच्या परिसरात अवघ्या 24 तासांच्या अंतराने घडलेल्या दोन धाडसी चोरीच्या घटनांनी देगलूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या चोरीच्या घटनेतील आरोपींचा शोध सुरू असतानाच त्याच परिसरात दुसरी मोठी चोरी घडल्याने पोलिसांच्या गस्तीसह गुप्त माहिती यंत्रणा आणि गुन्हे उघडकीस आणण्याच्या क्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
23 जुलै रोजी देगलूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी देवापूर येथील 70 वर्षीय वृद्ध शेतकरी रामलू नेरलवार यांच्या अंगावर टोमॅटो सॉससारखा पदार्थ फेकून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या जवळील 32 हजार रुपयांची रोकड लंपास केली. या धक्कादायक घटनेतील आरोपींचा अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नसतानाच, अवघ्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 जुलै रोजी याच परिसरातील जी.पी. टॉवर्समधील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर भरदिवसा आणखी एक मोठी चोरीची घटना घडली.
तालुक्यातील कावळगाव येथील शेतकरी हनमंत शिरगिरे हे आपल्या पैशाची बॅग दुचाकीच्या हँडलला लावून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने दुचाकीजवळ पन्नास रुपयांची नोट टाकली. ‘तुमचे पैसे खाली पडले आहेत,’ असे सांगून शिरगिरे यांचे लक्ष विचलित करण्यात आले. ते नोट उचलण्यासाठी खाली वाकताच अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला लावलेली तब्बल दीड लाख रुपयांची बॅग क्षणार्धात लंपास केली.
अवघ्या 24 तासांच्या अंतराने, एकाच वर्दळीच्या परिसरात आणि भरदिवसा घडलेल्या या दोन चोरीच्या घटनांमुळे देगलूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या चोरीचा तपास सुरू असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असतानाच त्याच परिसरात दुसरी चोरीची घटना घडल्याने चोरट्यांनी देगलूर पोलिसांच्या नाकावर टिच्चून आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
डी.बी. पथक निष्क्रीय…
गुन्हे उघडकीस आणणे, सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवणे, संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि प्रतिबंधात्मक कारवाई करणे यासह अन्य जबाबदारी असलेल्या डीबी (डिटेक्शन ब्रँच) पथकाच्या कार्यक्षमतेवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात चोरी, फसवणूक आणि इतर गुन्हे घडत असताना गुन्हेगारांना वेळीच जेरबंद करण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे. विशेष म्हणजे  तहसील कार्यालय, बँका आणि व्यापारी परिसरात दररोज लाखो रुपयांचे व्यवहार होत असताना या ठिकाणी प्रभावी गस्त, संशयितांवर नजर आणि गुप्त माहिती संकलन करण्यात पोलिस यंत्रणा का अपयशी ठरत आहे ?  असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
24 तास उलटूनही चोरटे मोकाट!
पहिल्या चोरीच्या घटनेला 24 तास उलटूनही आरोपींचा साधा सुगावाही लागलेला नाही. त्याचदरम्यान त्याच परिसरात दुसरी मोठी चोरी घडल्याने पोलिसांच्या तपास यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सलग दोन घटना घडूनही आरोपी मोकाट असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. सदरील दोन्ही चोरींचा उलगडा करण्यात देगलूर पोलीस यशस्वी होतात की, नेहमीप्रमाणे ‘चोरीचा तपास जोरात सुरू आहे’ असे सांगत तपासाचा गाजावाजा केला जातो आणि काही दिवसांनंतर प्रकरण तपासाच्या नावाखाली गुलदस्त्यात गुंडाळले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

nanded updates

नांदेड अपडेट्स हे केवळ एक डिजिटल न्यूज पोर्टल नाही, तर नांदेड जिल्ह्याचा विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान माहितीचा स्रोत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!