राजकीय

देगलूरात काँग्रेस-राष्ट्रवादीत ‘शह-कटशहाचे’ राजकारण पेटले,

एकमेकांच्या कारभारातील कथित भ्रष्टाचारावर आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा...

शब्बीर शेख
नांदेड  : देगलूर नगरपरिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि विरोधी काँग्रेस यांच्यात आता राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, एकमेकांच्या कार्यकाळातील विकासकामांवर कथित भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाच्या कामांचे आरोप करत दोन्ही पक्षांनी ‘शह-कटशहाचे’ राजकारण सुरू केले आहे. निवेदनांचा पाऊस, चौकशीच्या मागण्या आणि आंदोलनाच्या इशाऱ्यांमुळे देगलूरचे राजकारण चांगलेच तापले आहे.
नुकत्याच झालेल्या देगलूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात थेट लढत झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासह तब्बल १५ जागा जिंकत नगरपरिषदेवर एकहाती सत्ता मिळवली, तर काँग्रेसला १२ जागांवर समाधान मानावे लागले. इतर कोणत्याही पक्षाला खातेही उघडता आले नाही. सत्ता स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेपासून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवर धारेवर धरले. त्यानंतर आता दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या कार्यकाळातील विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा शहराध्यक्ष सय्यद अत्थर हाश्मी यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात काँग्रेसच्या कार्यकाळात नरंगल रोड येथील मुस्लिम कब्रस्तानाच्या संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे व बोगस पद्धतीने झाल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या या आरोपांना काँग्रेसनेही तात्काळ प्रत्युत्तर दिले आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक १२ मध्ये ‘नमो उद्यान’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामामध्ये बोगस घटकांचा वापर व आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. या कामाची देयके तातडीने स्थगित करून स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अन्यथा देगलूर नगरपरिषदेवर युवक काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास दत्ताजी नरबागे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
देगलूर नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा आरोप-प्रत्यारोपांचा संघर्ष आता अधिक तीव्र होत असून, विकासकामांपेक्षा राजकीय कुरघोडीच अधिक चर्चेत आली आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या कार्यकाळातील कामांवर गंभीर आरोप केल्याने आता प्रशासन कोणत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करते आणि सत्य काय समोर येते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
आता दोन्ही प्रकरणांमध्ये प्रशासन निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणणार की हे आरोप केवळ राजकीय कुरघोडीपुरतेच मर्यादित राहणार, याकडे देगलूरकरांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, नगरपरिषदेतील राजकारण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

nanded updates

नांदेड अपडेट्स हे केवळ एक डिजिटल न्यूज पोर्टल नाही, तर नांदेड जिल्ह्याचा विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान माहितीचा स्रोत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!